नाशिक। दि. ९ जुलै २०२५: सिडकोतील दत्त मंदिर बस स्टॉपजवळील दारू दुकानासमोरच दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद झाला. त्यातील एकाने दुसऱ्याच्या डोक्यात लाकडी दांडुक्याने प्रहार करून खून केला. अंबड पोलिसांनी मद्यपी हल्लेखोरास ताब्यात घेतले आहे. त्रिमूर्ती चौकातील पोलिस चौकीपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर भरदिवसा वर्दळ असताना ही घटना घडल्याने अंबड पोलिसांवर नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंटवाडीतील चंदर गारे (६५) आणि त्यांच्यासोबतचा संशयित सरमोद कौर (३५) हे दोघेही दारू दुकानाबाहेरच दारू पित होते. किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यात घारे यांनी कौरला धक्का दिल्याने कौरने जवळच पडलेला लाकडी दांडका घारे यांच्या डोक्यावर मारल्याने घारे जागीच कोसळले. त्यानंतरही कौरने चार वार केल्याने घारे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन कौर यास अटक केली. दोघेही दारूच्या नशेत भांडले आणि त्यातूनच हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळापासून अवघ्या ६० ते ७० मीटरवर उंटवाडी शाळा असून विद्यार्थ्यांमध्ये भीती पसरली होती. २०० मीटरपेक्षा कमी अंतरावर पोलिस चौकी ही चौकी सुरू असल्यास अथवा शाळा सुटणे, भरण्यावेळी पोलिसांची या भागात गस्त वाढविल्यास अशा घटना कमी होऊ शकतात, अशी प्रतिक्रिया येथील नागरिक व्यक्त करत आहेत. (अंबड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ४५३/२०२५)