नाशिक। दि. ७ जुलै २०२५: महिलेला दमबाजी करत तिच्याकडे असलेले डेबिट कार्ड हिसकावून घेत ढकलून देत पोबारा करणाऱ्या रिक्षा चालकाने महिलेच्या बँक खात्यातून २३ हजारांची रोकड लांबविली होती. या रिक्षा चालकाला नाशिक रोड पोलिसांनी बेड्या ठोकून अटक केली आहे.
येवला येथे राहणाऱ्या फिर्यादी या १३ जून रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्रजवळ उभ्या होत्या. त्यावेळी एका अनोळखी रिक्षा चालकाने त्यांना दमबाजी करून बळजबरीने तिच्याजवळून बळजबरीने डेबिट कार्ड घेऊन तिला रिक्षातून ढकलून दिले. त्यानंतर त्या रिक्षा चालकाने त्या कार्डचा वापर करत वेळोवेळी बँक खात्यातून रक्कम काढून एकूण २३ हजार रुपये लांबविले होते.
याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे योगेश रानडे, रोहित शिंदे, अरुण गाडेकर यांनी बँकेच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्याद्वारे रिक्षा चालकाचा शोध घेत असताना पोलिस अंमलदार विशाल पाटील, विष्णू गोसावी, महेंद्र जाधव, सागर आडणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संशयास्पद रिक्षा जेलरोड पट्ट्यावर चालते, असे समजले.
पोलिसांनी सापळा रचून संशयित रिक्षा चालक प्रवीण आनंद नेटावणे (रा. शांती पार्क, उपनगर) यास ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्यात वापरलेली रिक्षा (एमएच १५-एके ६५९९) जप्त केली आहे. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. (नाशिकरोड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३४९/२०२५)