नाशिक। दि. ३ जुलै २०२५: अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेने अद्यापही हवीतशी गती घेतली नसून तिसऱ्या दिवशी तिन्ही शाखांसाठी विभागात ३९ हजार प्रवेश झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक १६ हजार ६५२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. प्रवेशासाठी विलंब दूर झाल्याने तिसऱ्या दिवशी २४.८७टक्के इतका प्रवेश नोंदवला गेला.
नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, जळगाव जिल्ह्यात तीन दिवसांत ३९ हजार २२९ प्रवेश झाले आहेत. यात २४.८७ टक्के प्रवेश नाशिक जिल्ह्यातीलच झाले आहेत. बुधवारी (दि. २) प्रवेश संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे काही महाविद्यालयांमध्ये
प्रवेशासाठी खिडकी वाढविण्यात आली. एकीकडे प्रवेशप्रक्रिया सुरू असताना विद्यार्थ्यांना दाखल्यांची पूर्तता होत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार कायम आहे. पहिल्या यादीत नाशिक जिल्ह्यातील एक लाख सहा हजार ३०० जागांपैकी ३९,२२९ (२७.३२ टक्के) विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. दोन दिवसांत सर्वाधिक प्रवेश कला शाखेचे झाले आहेत. दरम्यान उत्पन्नाचा दाखला वेळेत मिळतो. मात्र, नॉन क्रिमीलेअर, इडब्ल्यूएस आणि जातीचे दाखले अडकून पडले असल्याची तक्रार विद्यार्थी प्रवेशाच्या वेळी करताना दिसून आले.
७ जुलैनंतर दुसरी फेरी:
११ वी प्रवेश प्रक्रिया राज्यातील ९,४३५ कनिष्ठ महाविद्यालयांतील एकूण १९, ३२४ शाखांमध्ये सुरू असून, कप फेरीअंतर्गत २८ जून रोजी प्रवेश यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर ७ जुलैपर्यंत पहिली फेरी चालणार असून त्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.