नाशिक। दि. २६ जून २०२५: सातपूर परिसरात मानवी संबंधांची मर्यादा ओलांडणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या एका महिलेवर तिच्या पुतण्यानेच लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातपूरच्या श्रमिक नगर भागात राहणाऱ्या पीडित महिलेने याबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडिता आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. पीडित महिलेवर मानसिक आजारासाठी औषधोपचार सुरू आहेत.
१९ जून २०२५ रोजी, पीडिता औषध घेतल्यानंतर झोपलेली असताना आरोपी पुतण्या तिच्या बेडरूममध्ये शिरला. त्या वेळी घरात इतर कुणीही नसल्याची संधी घेत त्याने पीडितेवर जबरदस्ती केली. पीडित महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.
या घटनेनंतर जेव्हा पीडितेने त्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने तिला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. इतक्यावरच न थांबता, २५ जून रोजी त्याने पीडितेला पुन्हा एकदा फोन करून शारीरिक संबंधांची मागणी केली. नकार दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास सातपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. आर. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १९२/२०२५)
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790