मुंबई | 21 मे 2025: महाराष्ट्रातील अकरावी वर्गाच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून औपचारिक सुरुवात झाली असली तरी, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या ऑनलाइन प्रक्रियेच्या संकेतस्थळावर (www.mahafyjcadmissions.in) तांत्रिक बिघाड झाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे लॉगिन होऊ शकले नाही आणि काहींची भरलेली माहिती सेव्ह होण्यात अडथळे निर्माण झाले.
यंदा पहिल्यांदाच राज्यभरात संपूर्ण अकरावी प्रवेश प्रक्रिया एकत्रितपणे ऑनलाइन स्वरूपात राबवली जात आहे. यामुळे एका अर्जाद्वारे विविध शहरांतील महाविद्यालयांसाठी प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. मात्र, संकेतस्थळ सतत डाऊन होत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे.
शैक्षणिक संस्थांतील कर्मचाऱ्यांनीही तांत्रिक अडचणींचा अनुभव घेतल्याचे समजते. परिणामी, विद्यार्थ्यांना ना पसंतीक्रम भरता आला ना अर्ज पूर्ण करता आला. ही परिस्थिती पाहता, प्रवेश प्रक्रियेच्या सुरुवातीलाच प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, शिक्षण संचालनालयाने या अडचणी लवकरात लवकर दूर करण्याचे आश्वासन दिले असून, प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरळीत होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रियेचा तपशील पुढीलप्रमाणे:
- नोंदणी व पसंतीक्रम नोंदणी: 21 ते 28 मे
- तात्पुरती गुणवत्ता यादी: 30 मे
- हरकती व दुरुस्ती प्रक्रिया: 30 मे ते 1 जून
- अंतिम गुणवत्ता यादी: 3 जून
- प्रवेश वाटप (पहिली फेरी): 5 जून
- महाविद्यालय वाटप यादी पोर्टलवर: 6 जून
- प्रवेश प्रक्रिया (पहिली फेरी): 6 ते 12 जून
- दुसऱ्या फेरीतील जागा जाहीर: 14 जून
विद्यार्थ्यांनी www.mahafyjcadmissions.in या अधिकृत पोर्टलवरून प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तांत्रिक अडचणींसंदर्भात लवकरात लवकर सुधारणा होऊन विद्यार्थ्यांना सुलभतेने अर्ज प्रक्रिया पूर्ण करता यावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790