नाशिक (प्रतिनिधी): पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची घटना सिडको परिसरात घडली आहे.
हेमंत प्रभाकर पवार (३८, रा. पांगरे मळा, बडदेनगर) असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी फिर्यादी प्रभाकर पवार (६७) यांच्या फिर्यादीवरून हेमंत यांच्या पत्नी संशयित सुगंधा पवार, सासरे हरी देवरे, सासू रत्ना देवरे (रा. सातपूर) संध्या मांडवळे (रा. पुणे) सुगंधा हिची मैत्रीण मोना जेऊघाले (रा. नाशिक) यांच्याविरूद्ध अंबडला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत हेमंत याची पत्नी सुगंधा पवार हिने व तिच्या सासरचे व्यक्ती यांनी त्याच्याकडे १ लाख रुपये घेण्यासाठी प्रचंड तगादा लावला होता. त्यानंतर पत्नीने आईवडिलांपासून त्यांना वेगळे राहायचे असेही सांगितले होते. ते दोघे वेगळे राहायला गेले; मात्र तरीही सुगंधा यांच्या वर्तणुकीत फरक पडला नाही. त्यांच्यामध्ये वाद वाढतच होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे मानसिक त्रास असह्य झाल्याने अखेर हेमंतने राहत्या घरात १४ ऑगस्ट रोजी गळफास घेत आत्महत्या केली होती.
त्यांनी चिठ्ठीत पाचही संशयितांची नावे लिहून “‘”यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा करावी…तुझी इच्छा पूर्ण करतो बस्स…” असे नमूद केले आहे. पोलिसांनी ही चिठ्ठी तपासासाठी ताब्यात घेतली आहे. हेमंत यांच्या पश्चात आईवडील, एक मुलगी, बहीण असा परिवार आहे. पुढील तपास अंबड पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिरसाठ हे करीत आहेत. (अंबड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ५४१/२०२४)