नाशिक (प्रतिनिधी): जय भवानी रोड लोणकर मळा येथे आर्टिलरी सेंटरच्या संरक्षक कुंपणाच्या भिंतीवर शनिवारी सायंकाळी बसलेल्या बिबट्याचे परिसरातील रहिवाशांना दर्शन झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या भागात पुन्हा पिंजरा लावावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
जय भवानी रोड येथील आर्टिलरी सेंटरच्या संरक्षक कुंपणाच्या आतील बाजूस मोठ्या प्रमाणात पडीक वस्तू व जंगल सदृश परिस्थिती आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी बिबट्याचे वास्तव्य राहत आहे.
आर्टिलरी सेंटरमधून अनेक वेळा बिबट्या भक्ष्य व पाण्याच्या शोधासाठी लोकवस्तीत येत असल्याचे वारंवार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहे. अनेक ठिकाणी मुक्या प्राण्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा फडशा पडलेला आहे.
शनिवारी सायंकाळी सहा-साडेसहाच्या सुमारास लोणकर मळा येथील आर्टिलरी सेंटरच्या संरक्षक कुंपणाच्या भिंतीवर बिबट्या ठाण मांडून बसल्याचे परिसरातील रहिवाशांच्या निदर्शनास आले. अनेक रहिवासी व युवकांनी तत्काळ मोबाईल मध्ये बिबट्याच्या दर्शनाचे चित्रीकरण करून सुरक्षितेच्या कारणास्तव सोशल मीडियावर व्हायरल केले.