नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे ९५ हजार रुपये किमतीचे १९ ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस हवालदार संजय ताजणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी राहुल अशोक ब्राह्मणे (वय २०, रा. महादेव मंदिराजवळ, बजरंगवाडी, मुंबई नाका, नाशिक) हा काल (दि. १६) दुपारी दीड वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे रोडकडून इस्कॉन मंदिराकडे जाणाऱ्या रोडलगत नासर्डी नदीच्या बाजूला चिंचेच्या झाडाखाली अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी गुन्हे शाखेला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन तेथे आरोपी राहुल ब्राह्मणे याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याच्या ताब्यातून दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन, तसेच मॅफेड्रॉन पावडरचे १९० ग्रॅम वजनाचे सीलबंद केलेले पाकीट मिळून आले, तसेच २० रिकाम्या पिशव्या आढळून आल्या. आरोपी ब्राह्मणे हा हे अमली पदार्थ स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आला.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत मॅफेड्रॉनसह एक मोबाईल फोन असा १ लाख ५५ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात राहुल ब्राह्मणेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आला आहे. (मुंबई नाका पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २३६/२०२४)