नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): दिल्ली न्यायालयात सुरू असलेल्या एका खटल्याच्या सुनावणीसाठी कुख्यात गँगस्टर व मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम यास शनिवारी (ता. ३) रात्री पुन्हा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले.
गुरुवारी (ता. १) पहाटे सालेम यास नाशिकरोड येथून रेल्वेने दिल्ली येथे नेण्यात आले होते. अबू सालेम याच १० ते १५ जुलै यादरम्यान नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून सुरक्षेच्या कारणास्तव हलविण्यात आले होते.
दरम्यान, शुक्रवारी (ता.२) दिल्लीतील न्यायालयात एका खटल्याच्या कामकाजानिमित्ताने अबू सालेम याची तारीख होती. त्यासाठी गुरुवारी (ता. १) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास नाशिकरोड रेल्वेस्टेशन येथून सालेम यास रेल्वेने दिल्लीला नेण्यात आले होते. शुक्रवारचे न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर रात्री उशिरा ते कर्नाटक एक्सप्रेसने नाशिकच्या दिशेने रवाना झाले. कर्नाटक एक्सप्रेस मनमाडपर्यंतच असल्याने मनमाडवरून सालेम यास पोलिस वाहनातून नाशिकरोडला आणण्यात आले.
मनमाड रेल्वेस्टेशनवर शनिवारी (ता. ३) सायंकाळी पाचच्या सुमारास कडेकोट पोलिस बंदोबस्तामध्ये सालेम यास पोलिस वाहनात बसविण्यात आले. त्यानंतर चांदवड मार्गे सालेम यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. यावेळी नाशिकचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्तात अबू सालेम याचा दिल्ली प्रवास झाला.