नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मागील महिन्यात (दि.२० मे) रोजी नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी मतदान झाले होते. त्यानंतर आज मंगळवार (दि.४ जून) रोजी सकाळी आठ वाजेपासून शहरातील अंबड परिसरातील वेअर हाउसमध्ये या दोन्ही मतदारसंघांसाठी मतमोजणी सुरु होती. यानंतर आता यामधील नाशिक लोकसभेचा निकाल हाती आला आहे.
२१-नाशिक मतदार संघातून राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे यांना निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी विजयी घोषित केले.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी तब्बल १ लाख ६१ हजार १०३ मतांच्या फरकाने विजय मिळविला आहे. वाजे यांना ६ लाख १४ हजार ५१७ तर हेमंत गोडसे यांना ४ लाख ५३ हजार ४१४ मते मिळाली आहेत. तसेच अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांना ४४ हजार ४१५ मते मिळाली आहेत.
दरम्यान, वाजे यांनी पहिल्या फेरीपासून मिळविलेली आघाडी कायम ठेवत १४ व्या फेरीत १ लाख ४७ हजार ०१२ मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर वाजे यांनी ही आघाडी कायम ठेवत १८ व्या फेरीत १ लाख ७८ हजारांची गोळाबेरीज केली. यावेळी वाजे यांच्या विजयाची खात्री पटताच सिन्नर, इगतपुरी, आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील विविध भागांत एकच जल्लोष सुरु झाला होता.