नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): कश्यपी डॅम परिसरातील एका हॉटेलमध्ये मालक व वेटर यांच्याशी वाद घालून गावठी पिस्तूलातून गोळीबार करत दहशत निर्माण करत फरार झालेली टोळी गंगापूर पोलिसांनी जेरबंद केली. इम्रान अयनूर शेख (रा. गणेश चौक, संजीवनगर, अंबड), शेखर दिलीपराव कथले, अरबाज शब्बीरखान पठाण (दोघे रा. परभणी), राहुल श्याम क्षत्रिय (रा. संत जनार्दननगर, नांदूरनाका) असे या टोळीमधील संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कश्यपी येथील एका हॉटेलात येथे किरकोळ कारणातून हॉटेलमालक व वेटर यांच्यावर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने संशयितांनी सात गोळ्या फायरिंग करत कारमधून फरार झाले होते. हरसूल पोलिस संशयितांचा पाठलाग करत असताना ही कार नाशिक शहराच्या हद्दीत गेल्याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली.
गंगापूर पोलिसांनी गंगापूरनाका येथे सापळा रचून संशयित कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता कारचालकाने कार न थांबवता पलायन करण्याचा प्रयत्न केला. पथकाने पाठलाग करत कार एसएसटी टी. पॉइंट येथे थांबवली व संशयितांना ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता कारमध्ये सीटखाली गावठी बनावटीचे स्टीलचे पिस्तूल आणि रिकामी पुंगळी आढळून आली. रवींद्र मोहिते, रमेश गोसावी, मच्छिंद्र वाकचौरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.