नाशिक: प्राथमिक शिक्षकाच्या मुलाचे UPSC परीक्षेत यश !

नाशिक (दीपक श्रीवास्तव): निफाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक असलेले विजयकुमार डेरले यांचे सुपुत्र आविष्कार डेरले यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत देशात ६०४ व्या क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे फक्त दुसऱ्या प्रयत्नात त्याने ही गरुड भरारी घेतली आहे.

अविष्कारचे शिक्षण हे निफाडच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षण हे वैनतेय विद्यालयामध्ये झालेले आहे. आपल्या शैक्षणिक कारकीर्दीत त्याने प्रत्येक वेळेस प्रथम क्रमांक पटकावलेला आहे.

केवळ शैक्षणिक गोष्टीतच नव्हे तर क्रीडा आणि संगीत या विषयात देखील त्याला रुची आहे. खोखो खेळामध्ये त्याने निफाडच्या संघाचे नेतृत्व राज्यस्तरापर्यंत केलेले आहे. तर संगीत क्षेत्रामध्ये त्याने संगीत विशारद ही देखील पदवी मिळवलेली आहे. भौतिक शास्त्रातून त्याने पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असून केंद्रीय लोकसेवा परीक्षेमध्ये त्याने मानव वंश शास्त्र हा विशेष विषय निवडला होता.

यूपीएससीच्या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी त्याला पुणे येथील अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले तर पुढील अभ्यास त्याने दिल्ली येथे राहून पूर्ण केला.

निफाड सारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेणारा विद्यार्थी राज्यस्तरावर आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवून यूपीएससी परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केल्याबद्दल आविष्कार डेरले याचे सर्व स्तरातून जोरदार अभिनंदन केले जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790