नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लढविणारे उमेदवार आणि त्यांचे राजकीय पक्ष यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी करावी लागणार आहे.
त्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने याबाबत सविस्तर निर्देश आणि प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी विहित नमुने देखील जारी केले आहेत. ही माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक लढविणारे उमेदवार यांनी निवडणूक आयोगाने विहित केलेल्या शपथपत्रातील नमुन्यात प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची परिपूर्ण माहिती देणे बंधनकारक आहे. उमेदवाराविरूद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती देतांना ती ठळक स्वरूपात असणे आवश्यक आहे.
तसेच उमेदवार एखाद्या राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत असेल तर अशा उमेदवारांनी त्यांच्या विरूद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती संबंधित पक्षास देखील अवगत करावी. राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांवरील प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. उमेदवार आणि राजकीय पक्ष यांनी प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांच्या माहितीस वर्तमानपत्रातून आणि इलेक्ट्रॅानिक मीडियाद्वारे देखील प्रसिद्धी देणे आवश्यक असून अशी प्रसिद्धी निवडणूक कालावधीत आयोगाने विहित केलेल्या नमुन्यात किमान तीन वेळा द्यावयाची आहे.
आयोगाने विहित केलेल्या C-1 नमुन्यात वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॅानिक मीडियाद्वारे उमेदवारांनी प्रसिद्धी द्यावी. तसेच राजकीय पक्षांनी त्यांचेसाठी विहित केलेल्या C-2 नमुन्यात वर्तमानपत्र, इलेक्ट्रॅानिक मीडिया आणि पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धी द्यावी.
प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांच्या माहितीची तीन वेळा प्रसिद्धी आयोगाने आखून दिलेल्या विहित वेळापत्रकानुसारच करण्यात येईल याची दक्षता संबंधित उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी घ्यावी. प्रथम प्रसिद्धी उमेदवारी अर्ज माघारीच्या तारखेपासून पहिल्या चार दिवसातच करावी. दुसरी प्रसिद्धी यापुढील पाच ते आठ दिवसात करावी आणि तिसरी प्रसिद्धी 9 व्या दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत करावी.
उमेदवाराविरूद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती ही निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर वेबसाईटवरील Know Your Candidate या लिंकवर देखील उपलब्ध राहील. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लढविणारे उमेदवार, राजकीय पक्ष यांनी या सूचनांची नोंद घ्यावी आणि याबाबत अधिक माहितीसाठी आयोगाचे या संबंधित निर्देशांचे अवलोकन करावे, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी कळविले आहे.