नाशिक-मुंबई महामार्गावर गुटख्यासह 46 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरी बायपासच्या टाके घोटी शिवारातील नाशिक-मुंबई महामार्गावर हॉटेल ग्रँड परिवारसमोर बुधवार (ता. १४) मध्यरात्री दीडच्या सुमारास नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर गुटखासह सुगंधित तंबाखू, पानमसाला, जर्दा आदी चोरटी वाहतूक करणारा सहाचाकी कंटेनर (डीडी ०१, एफ ९१०२) यांसह मोबाईल आदी मुद्देमाल २१ लाख दोन हजार चारशे रुपये किमतीचा गुटखा यांसह एकूण ४६ लाख २३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे यांच्यासह पोलिस पथकाने कारवाई करीत हस्तगत केला आहे.

या कारवाईत एस. एच. के. नाव छापलेले सुगंधित तंबाखू गुटखा ४० पिवळ्या रंगाच्या गोण्या, सहा पांढऱ्या रंगाच्या गोण्या, मोठ्या पिशव्यांसह ७३ हिरव्या, लाल, रंगाचे पुडे, २५ लाख रुपये किमतीचे आयशर वाहन, एक मॅक्स कंपनीचा, एक ओपो कंपनीचा मोबाईल आशा मुद्देमालासह दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली.

संशयित आरोपी अमृत भगवान सिंह (वय ४२, रा. वडवेली, पो. हीनौतीया, ता. खिलचीपूर, जि. राजगड मध्य प्रदेश) व पूनमचंद होबा चौहान (वय ५२, रा. सकारगाव, ता. बिकनगाव, जि. खरगोन, मध्य प्रदेश) यांना इगतपुरी पोलिस ठाण्यात मुद्देमालासह महाराष्ट्र राज्य उत्पादन साठा प्रतिबंधनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत फिर्यादी पोलिस शिपाई मनोज सानप (वय ४१) नाशिक ग्रामीण गुन्हे शाखा विभाग यांनी फिर्याद नोंदविली आहे. बुधवार मध्यरात्री दीडच्या सुमारास टाके घोटी शिवारातील महामार्गावर चोरट्यामार्गाने मुंबईकडे गुटखा घेऊन जाणाऱ्या कंटेनरची स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक राजू सुर्वे यांना गुप्त माहिती मिळताच पोलिस पथक तैनात करून सापळा रचला.

अंधाराचा फायदा घेत गुटखा तस्करी करणारे कंटेनर पोलिसांनी थांबविले तेव्हा कंटेनरचालक व त्या सोबत असलेला सहाय्यकचालक दोघेही भयभीत झाले. गाडीत काय आहे, विचारताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी ताब्यात घेत तपास केला असता, गुटखा तस्करीचा प्रकार समोर आला.

या घटनेचा पंचनामा करीत मुद्देमालासह आरोपीला इगतपुरी पोलिस ठाण्यात आणून दुपारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत गुन्हा दाखल अंमलदार पोलिस नाईक शरद साळवे व तपासी अधिकारी सहाय्यक निरीक्षक कांचन भोजने अधिक तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790