नाशिक (प्रतिनिधी): विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशासाठी सीईटी परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत. या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे जाहीर केले आहे.
त्यानुसार मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने विविध शिक्षणक्रमांच्या सीईटी परीक्षा होतील. सर्वाधिक विद्यार्थिसंख्या असलेली एमएचटी-सीईटी परीक्षा एप्रिल व मे महिन्यात दोन टप्प्यात घेतली जाईल.
विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करता यावी, या उद्देशाने सीईटी सेलतर्फे सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले जात असते. इयत्ता बारावी आणि पदवी अभ्यासक्रमांच्या आधारे अनुक्रमे पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाते.
यापूर्वी कोरोना महामारीमुळे विस्कळित झालेले सीईटी परीक्षांचे वेळापत्रक शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून सुरळीत झाले आहे. यामुळे प्रवेशप्रक्रिया वेळेत पूर्ण करणेदेखील यंत्रणांना शक्य होत आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सर्व परीक्षा ऑनलाइन:
सीईटी परीक्षांना प्रविष्ट विद्यार्थी संख्येनुसार एकापेक्षा जास्त दिवस व सत्रांमध्ये परीक्षांचे आयोजन केले जात असते. संगणकावर आधारित (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.
केवळ आर्किटेक्चर आणि डिझाईन शिक्षणक्रमांच्या परीक्षेत चित्रकला विषय असल्याने या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होतील.
सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक असे: अभ्यासक्रम संभाव्य तारीख:
एलएलबी (३ वर्षे) ११ ते १३ मार्च, बी.एड. १५ ते १८ मार्च, एमबीए २३ व २४ मार्च, एमसीए ३० मार्च, बी. डिझाइन ६ एप्रिल, एम. आर्क. ७ एप्रिल, एमएचटी-सीईटी १६ एप्रिल ते २ मे, एलएलबी (५ वर्षे) ७ व ८ मे, बी. एस्सी. (नर्सिंग) ९ व १० मे