चांद्रयान 3 पृथ्वीवर परतणार? विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर 14 दिवसानंतर काय करणार ?

चांद्रयान 3 ने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. चंद्रवार यान पाठवण्याचे भारताचे तिसरे मिशन यशस्वी ठरले अन् संपूर्ण देशभरातील लोकांना जल्लोष केला. चांद्रयान 3 ने यशस्वी लँडिंग केल्यानंतर विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आलं. प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील माहिती इस्रोला पाठवणार आहे.

ही मोहीम 14 दिवसांसाठी चालणार आहे. प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरला जी माहिती पाठवेल ती विक्रम लँडर पृथ्वीवर पाठवणार आहे. पण 14 दिवसानंतर आता पुढे काय होणार ?  चांद्रयान पृथ्वीवर परतणार का? हा प्रश्न आता चर्चेत आहे.

14 दिवसानंतर पुढे काय होणार ?:
रोव्हर आणि लँडरपासून 14 दिवस इस्रोला माहिती मिळणार आहे. कारण, या काळातच चंद्रावर सूर्यप्रकाश असेल. त्यानंतर त्या ठिकाणी अंधार (रात्र) पडणार आहे. ही रात्र एका दिवसाची नसून संपूर्ण 14 दिवसांची असेल. इथे रात्री खूप थंडी असेल. विक्रम आणि प्रज्ञान फक्त सूर्यप्रकाशातच काम करू शकत असल्याने 14 दिवसांनी आपलं काम थांबवतील. त्यामुळे 14 दिवसानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर या दोहोंचं काम थांबणार आहे. पण चंद्रावर जेव्हा परत सूर्य उगवेल त्यावेळी या दोन्हीचं काम पुन्हा सुरु होऊ शकतं.  सूर्य उगवल्यावर विक्रम आणि प्रज्ञान पुन्हा चंद्रावर काम करण्याची शक्यता असल्याचे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. तसं घडलं तर भारतासाठी आनंदाची बातमी ठरणार आहे.

चांद्रयान 3 पृथ्वीवर परतणार का ?:
चांद्रयान 3 पृथ्वीवर परतणार नाही. विक्रम आणि प्रज्ञान काम करणार नाहीत, पण ते चंद्रावरच राहतील. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाले. लँडर चंद्रावर उतरल्यानंतर सुमारे अडीच तासांनी रोव्हर प्रज्ञान विक्रमपासून यशस्वीपणे बाहेर आले. आता प्रज्ञान चंद्राच्या भूमीवर चालत आहे. 6 चाकी रोबोटिक वाहन प्रज्ञान रोव्हर चंद्रावरील माहिती पाठवणार आहे.

लँडिंगनंतरची प्रक्रिया नेमकी काय ?:
चांद्रयान 3 चे तीन भाग आहेत. त्यामधील एक प्रोप्लशन मॉड्यूल, जो लँडरला चंद्राच्या कक्षापर्यंत घेऊन गेला. त्यामधून विक्रम लँडर वेगळा झाला आणि प्रोप्लशन मॉड्यूल चंद्राच्या कक्षामध्ये फिरतोय. त्यामधून दोन भाग वेगळे झाले, त्यामध्ये विक्रम लँडर आणि रोवर प्रज्ञान यांचा समावेश आहे. विक्रम हा लँडर आहे, जो चंद्रावर लँड केलाय, त्यातून आता रोवर वेगळा झाला. आता प्रज्ञान रोवर चंद्रावर फिरेल अन् तेथील डेटा इस्रोला पाठवेल. विक्रमच्या यशस्वी लँडिंगनंतर प्रज्ञान रोवरने आपले काम सुरु केलेय. 

चांद्रयानच्या मोहिमेचं प्रमुख लक्ष्य काय?:

भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. चंद्रयान 3 चे प्रज्ञान रोवर चंद्रावरील पणी, माती, वातावरणासोबत खनिज याबाबतची माहिती गोळा करुन पाठवेल. दक्षिण ध्रुवावर अशी काही ठिकाणं आहेत, जिथे अब्जावधी वर्षांपासून अंधार आहे, कधीही सूर्यप्रकाश पडलेला नाही. अशा ठिकाणावरुन डेटा गोळा करणे रोवरसाठी ऐतिहासिक असेल. रोवरच्या या कामगिरीमुळे अनेक प्रकराच्या संशोधनाला चालना मिळेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील एकत्र केलेली सर्व माहिती रोवर लँडरला पाठवेल आणि लँडर ती भारतीय डीप स्पेस नेटवर्कला पाठवेल. यासोबतच चंद्राच्या पृष्ठभागावर मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, टायटॅनियम आणि लोह यांसारख्या घटकांची उपस्थिती शोधण्यात येईल.  चांद्रयान 3 च्या ऐतिहासिक कामगिरीमुळे स्पेस सायन्समध्ये भारताचे मोठे योगदान असेल.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790