नाशिक: सिडकोत २५ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; चार संशयित ताब्यात

नाशिक (प्रतिनिधी): येथील सावंतनगर भागातील हॉटेलमध्ये रात्री नऊ ते सव्वानऊ वाजेच्या सुमारास जेवण करत असलेल्या चार जणांपैकी एकावर बाहेरून आलेल्या टोळक्याने हल्ला करून युवकाचा निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी (दि. २५) रात्री घडली आहे.

परशुराम बाळासाहेब नजान (वय: २५, रा. पाथर्डी फाटा) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी रात्री उशिरा चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने सिडको परिसर हादरला आहे. अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ला करणारे संशयित कामठवाडे गावातील असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिकमध्ये दोन टोळ्यांतील चकमक प्रकरणी ६ आरोपी पकडले; २ गावठी कट्टे, स्विफ्ट कार जप्त

Update: याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की परशुराम बाळासाहेब नजान (वय 24) हा तरुण काल (दि. 25) सावतानगर येथील एका हॉटेलमध्ये मित्रासोबत रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जेवण करण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत असलेल्या मित्राचे व संशयितांचे चार-पाच दिवसांपूर्वी मोबाईलद्वारे ऑनलाईन शिव्या दिल्याच्या कारणातून भांडण झाले होते. त्याची कुरापत काढून संशयितांनी परशुराम व त्याच्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. परशुराम हा प्रतिकार करीत होता. त्यावेळी संशयितांनी हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर पडलेला पेव्हर ब्लॉक उचलून त्याच्या डोक्यात टाकला. यात परशुराम गंभीर जखमी झाला. त्याला त्याच्या मित्रांनी जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात औषधोपचारासाठी नेले; मात्र अतिरक्‍तस्रावामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना परशुरामचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले.

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या साल्हेरसह १२ किल्ले 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळ यादीत !

घटनास्थळी आणि जिल्हा रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अंबड पोलिसांसह युनिट एक आणि दोनचे कर्मचारी तळ ठोकून होते. हल्ल्याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 16 जुलै रोजी आयोजन

दरम्यान या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात:
परशुराम आणि त्याचे सहकारी हॉटेलमध्ये जेवण करत असतांना झालेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी संबंधित सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्या आधारे तपास सुरु आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790