नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील अनेक जवान सीमेवर कार्यरत आहेत. मागील काही महिन्यात अनेक जवानांना वीरमरण आले आहे. अशातच जिल्ह्यातील जवानांच्या अपघातात मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
अशातच साक्री ते शिर्डी या महामार्गावर ट्रॅक्टर आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात एका जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
बागलाण तालुक्यातील सौंदाणे येथील भारतीय सैन्यात असलेले जवान साहेबराव सोनवणे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. छत्तीसगड राज्यातील एका आर्मी कॅम्पमध्ये जवान सोनवणे हे कार्यरत होते. दरम्यान, ते नुकतेच दोन दिवसांपूर्वीच आठ दिवसांच्या सुट्टीवर गावी आले होते.
काल सकाळीच काही कामानिमित्त ते दासवेल गावी राहत असलेल्या मामाला भेटायला गेले होते. सायंकाळपर्यंत काम आटोपून सात वाजेच्या सुमारास ते आपल्या मोटर सायकलने परतत होते. अशातच साक्री शिर्डी महामार्गावर असताना बागलाण तालुक्यातील आव्हाटी परिसरात अपघात झाला. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
साक्री शिर्डी महार्गावरून घरी परतत असताना याचवेळी कांद्याने भरलेला ट्रॅक्टर सटाणा येथे जात होता. कांद्याच्या भरलेला ट्रॅक्टरला जवान सोनवणे हे ओव्हरटेक करत असतांना अचानक ट्रॅक्टर चालकाने वळण घेतल्याने हा अपघात झाला आहे. यात जवान साहेबराव सोनवणे यांची दुचाकी ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली आल्याने ते मागच्या चाकात गेले. यात ते गंभीर जखमी झाले. लागलीच स्थानिक वीरगाव फाट्यावरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कांद्याच्या ट्रॉलीखाली अडकून पडलेल्या जवानास बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. काही वेळातच त्यांना बाहेर काढल्यानंतर उपचारासाठी सटाणा शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली आल्याने अगंभीर जखमी झाले होते. रक्तश्रावही अधिक झाला होता. त्यामुळे जवानावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना पुरेसा वेळ मिळाला नाही. आणि अपघातात भारतीय जवानाचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ दाखल झाले होते. मात्र जवानाच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. सौंदाणे गावात ही बातमी कळताच गावावर शोककळा पसरली असून सोनावणे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.