नाशिक (प्रतिनिधी): देशातील विविध शहरे विमानसेवेने नाशिकशी जोडण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या मनीष रावल यांना ‘नाशिक सिटीझन्स फोरम’ ने मार्च महिन्याचे आउटस्टँडिंग सिटीझन ऑफ नाशिक’ म्हणून घोषित केले आहे. नाशिकच्या विकासासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या कामाला दाद मिळण्यासाठी ‘नाशिक सिटीझन फोरम’ तर्फे दर महिन्याला आउटस्टँडिंग सिटीझन ऑफ नाशिक’ पुरस्कार दिला जातो.
देशातील विविध शहरे व महानगरांशी विमानसेवेने जोडले जात हवाई नकाशावर नाशिकचे नाव ठळक व्हावे तसेच त्यामाध्यमातून नाशिकमध्ये बडे उद्योगसमूह यावेत म्हणून झोकून देत सातत्याने प्रयत्नशील असलेल्या मनिष रावल यांना ‘नाशिक सिटीझन्स फोरम’ने मार्च महिन्याचे ‘आउटस्टँडींग सिटीझन ऑफ नाशिक’ म्हणून निवडले आहे. रावल यांच्यासोबतच याआधी हा पुरस्कार मिळालेल्या शरण्या शेट्टी व चंद्रकिशोर पाटील यांनाही दि. १३ एप्रिल रोजी राज्याचे कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीचे सीईओ म्हणून कार्यरत असलेल्या कुशवाह यांच्या प्रमुख उपस्थितीत आयटीआय सिग्नलवरील नाईस संकुलमध्ये बुधवार दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हे ‘आउटस्टँडींग सिटीझन’ पुरस्कार प्रदान केले जातील. यावेळी ‘नाशिकमध्ये कौशल्य विकासाच्या संधी व उपायययोजना’ याविषयावर कुशवाह हे मार्गदर्शन करणार आहेत. त्याआधी फोरमच्या माध्यमातून घरेलू कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या पहिल्या बॅचचा शुभारंभही कुशवाह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
नाशिकच्या उन्नती आणि उत्थानासाठी विविध क्षेत्रांत अविरतपणे कार्यरत असणाऱ्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींच्या कामाला दाद देण्यासाठी ‘नाशिक सिटीझन फोरम’तर्फे दर महिन्याला ‘आउटस्टँडींग सिटीझन ऑफ नाशिक’ हा पुरस्कार घोषित केला जातो. व्यवसायाने उद्योजक असलेल्या मनिष रावल यांनी नाशिकला हवाई सेवा कार्यान्वित व्हावी आणि ती सक्षमपणे चालावी म्हणून विविध स्तरांवर अथक प्रयत्न घेतले आहेत. निमा, आयमा या औद्योगिक संघटनांच्या ‘एव्हिएशन कमिटी’चे नेतृत्त्व करत रावल यांनी ओझर येथील एचएएलच्या विमानतळावरून नागरी हवाई वाहतूक सुरू व्हावी म्हणून भरीव योगदान दिले आहे. केंद्र सरकारकडे खासदार हेमंत गोडसे यांच्या सहकार्याने हवाई सेवेसाठी पाठपुरावा करणे, एचएएल प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळविणे आणि खासगी विमान कंपन्यांशी संपर्क साधून त्यांना नाशिकसाठी हवाई सेवा सुरू करण्यास राजी करणे अशा तीनही स्तरांवर रावल यांनी लक्षणीय प्रयत्न केले आहे.
एकीकडे विविध व्यावसायिक आणि औद्योगिक संघटनांच्या सदस्यांशी संपर्क साधून त्यांना हवाई सेवेचा वापर करण्यास उद्युक्त करणे आणि दुसरीकडे संभाव्य हवाई प्रवाशांचा तपशील गोळा करून तो हवाई कंपन्यांना सादर करत व्यवहार्यता पटवून देण्याचे कामही रावल यांनी केले आहे. त्याची परिणीती म्हणून सध्या नाशिकहून दिल्ली, अहमदाबाद, हैद्राबाद, चैनै आदी मेट्रो शहरांसाठी हवाई सेवा सुरू झाली आहे. ओझर विमानतळापासून नाशिक, शिर्डी, त्र्यंबक या ठिकाणांसाठी टॅक्सी सेवा सुरू करण्यातही रावल यांचे योगदान आहे. नाशिक विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा व येथून कार्गो सेवा सुरू व्हावी म्हणूनही रावल हलकॉनच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. दिंडोरीच्या अक्राळे औद्योगिक वसाहतीत रिलायन्स लाईफ सायन्सेसची २१०० कोटी रुपयांची गुंतवणूक इंडियन ऑईल कंपनीची ३५० कोटींची गुंतवणूक आणण्यातही रावल यांनी राजकीय नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांना सहकार्य केले आहे.