हृदयद्रावक! बेवारस अर्भकाचे कुत्र्यांनी तोडले लचके; नाशिकची घटना…
नाशिक (प्रतिनिधी): अंबड परिसरातील अंबिका नगरमध्ये एका दिवसाच्या बेवारस अर्भकाचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सदरील बेवारस अर्भक हे स्त्री जातीचे होते.
दुःखद आणि मन हेलवणारी बाब म्हणजे या एक दिवसाच्या जिवंत बाळाचे श्वानांनी लचके तोडले.
या स्त्री जातीच्या एक दिवसाच्या बाळाचा आवाज ऐकून स्थानिक जागरूक नागरिक आणि पोलिसांनी त्याला रुग्णालयात हलवले, मात्र उपचारादरम्यान या बाळाचा दुर्दैवी अंत झाला.
माणुसकीला काळिमा फासणारी अशी ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. तर या घटनेने शहर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून संबंधितांवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील होत आहे.
नाशिकच्या पाथर्डी आणि अंबड भागात एकाच महिन्याचा अंतराने दोन स्त्री जातीचे अर्भक बेवारस टाकून दिल्याच्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. 29 ऑक्टोबर रोजी पाथर्डी येथील कचरा डेपो येथे अज्ञातांनी स्त्री जातीचे अर्भक टाकून दिल्याचे समोर आले होते.
त्यांनतर एक महिन्यांच्या अंतराने पुन्हा एकदा एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक हे चुंचाळे भागात एका मोकळ्या प्लॉटवर पाण्याचे टाकी जवळ अंबिका नगर,दत्तनगर चुंचाळे शिवार या ठिकाणी बेवारस टाकून दिल्याचे समोर आले आहे.
दुर्दैवी बाब म्हणजे या बेवारस स्त्री जातीच्या एक दिवसाच्या बाळाच्या शरीराचे प्राण्यांनी काही भागाचे मांस खाऊन त्यातून अतिरक्तस्त्राव झाल्याने या बाळाचा मृत्यू झाला. तर परिसरातील काही सीसीटीव्ही मध्ये संशयित महिला आणि एक पुरुष हे बाळ घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले असून,CCTV च्या आधारे पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.