शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा पाठपुरावा
नाशिक (प्रतिनिधी): बाजीरावनगर ते आर डी सर्कल आणि गोविंदनगर ते सिटी सेंटर मॉल सिग्नल या रस्त्यांची आज बुधवारी महापालिका अधिकार्यांनी पहाणी केली.
मॉडेल रोड विकसित करण्यासाठी या रस्त्यांचा प्रस्ताव आयुक्त प्रशासक रमेश पवार यांना पाठविण्यात येणार आहे. शिवसेना, सत्कार्य फाउंडेशन यासाठी पाठपुरावा करीत आहे.
शहरातील सहाही विभागात अठरा मीटरपेक्षा जास्त रूंद असलेला प्रत्येकी एक रस्ता मॉडेल रोड म्हणून विकसित करण्याची संकल्पना आयुक्त रमेश पवार हे राबविणार आहेत. प्रभाग ३० मधील बाजीरावनगर ते आर डी सर्कल हा रस्ता सध्या नऊ मीटरहून कमी रूंदीचा आहे.
विकास आराखड्यात तो चोवीस मीटर प्रस्तावित आहे. सिटी सेंटर मॉल सिग्नल ते गोविंदनगर हा रस्ता तीस मीटर अस्तित्वात आहे. या दोन्हीही रस्त्यांना जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक करणे शक्य आहे.
दोन्ही किंवा एक रस्ता मॉडेल रोड म्हणून विकसित करावा, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांनी रहिवाशांच्या वतीने सोमवारी, १३ जून रोजी निवेदनाद्वारे केली आहे. महापालिकेच्या नवीन नाशिक सिडकोचे विभागीय अधिकारी मयुर पाटील, उपअभियंता हेमंत पठे, शाखा अभियंता जगदिश रत्नपारखी यांनी बुधवारी या रस्त्याची पहाणी केली. यावेळी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे आदी हजर होते. मागणीची त्वरित दखल घेतल्याबद्दल नागरिकांनी आयुक्तांचे आभार मानले आहेत.