नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
नाशिकच्या ८७ वर्षीय कुलकर्णी आजींनी त्यांच्या वाढदिवशी सैनिकांना दिली तब्बल ५ लाखांची भेट !
नाशिक (प्रतिनिधी): केवळ स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाला देशप्रेमाचा उमाळा येणारे, देशभक्ती आणि सैनिकांबाबत कळवळीचा दिखावा दाखविणाऱ्या व्यक्ती जागोजागी दिसतात. मात्र सच्च्या देशप्रेमाच्या भावनेने आणि सैनिकांप्रति असलेल्या आपुलकीच्या भावनेतून आयुष्याच्या उत्तरार्धात तब्बल ५ लाखांची देणगी देणाऱ्या व्यक्ती समाजात खरोखरच दुर्मिळ…
नाशिकच्या तब्बल ८७ वर्षांच्या आजी सुशीला सदाशिव कुलकर्णी यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सैनिक कल्याण मंडळाला तब्बल ५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. आणि सैनिकांसह त्यांच्या कुटुंबीयांप्रति आदरभाव व्यक्त केला.
वाढदिवस दणक्यात साजरे करून बडेजाव करण्याच्या सध्याच्या काळात अशाप्रकारे वाढदिवस साजरा करण्याची कृती ही खरोखरच समाजासाठी आदर्शवत मानावी लागेल. नाशिकमधील कुलकर्णी आजींनी त्यांच्या वाढदिवशी देशरक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या सैनिकांच्या कल्याण मंडळाला ५ लाखांचा धनादेश देत सैनिकांप्रति ऋण व्यक्त केले.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्योत्तर कालखंडातील आयुष्यातील अनेक चढ-उतार बघितले. अनेक संकटांचा सामना करत स्वतः त्या दोन वेळा मोठ्या आजारातून बचावल्या. देशसेवेसाठीच आपल्याला परमेश्वराने वाचविले, अशी भावना निर्माण झाल्याने त्यांनी सैनिकांसाठी मदत देण्याचा मानस त्यांचे चिरंजीव आणि लघुउद्योग भारती संस्थेचे अध्यक्ष विवेक कुलकर्णी यांच्याजवळ व्यक्त केला.
आईच्या मनातील भावना जाणून घेत विवेक कुलकर्णी यांनी तत्काळ आर्थिक तजवीज करत आई सुशीला कुलकर्णी यांच्या वाढदिवशी त्यांच्याच हस्ते सैनिक कल्याण मंडळाला पाच लाखांचा धनादेश देण्यासाठी पुढाकार घेतला. निवृत्त कमांडर विनायक आगाशे आणि जिल्हा सैनिक कल्याण मंडळाचे लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या मदतीचा विनियोग सैनिकांबरोबरच त्यांच्या अवलंबितांवर करण्याची ग्वाही कापले यांनी दिली.
यावेळी गीता आगाशे, सैनिक कल्याण मंडळाचे सहाय्यक अधिकारी अविनाश रसाळ यांच्यासह विवेक कुलकर्णी, स्वाती कुलकर्णी, दिनेश खरे, स्नेहल खरे, प्रशांत थोरात, संदीप शेटे, कमलाकर शेटे, सुमेध कुलकर्णी उपस्थित होते.
“सीमेवर लढणारा जवान आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशासाठी प्राणांची बाजी लावत असतो. त्या जवानांसाठी आपण प्रत्यक्ष रणांगणात किंवा सीमेवर जाऊन काही करू शकत नाही. त्यामुळे निदान त्यांच्याप्रति आपआपल्या परीने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. त्याच भावनेतून हा धनादेश दिला आहे.” असे सुशीला कुलकर्णी यावेळी म्हणाल्या !