नाशिक: बाहेरगावी कामाला येण्यास दिला नकार म्हणून रागात पतीने केला पत्नीचा खून
नाशिक (प्रतिनिधी): बाहेरगावी कामासाठी येण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीचा कोयत्याने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना देवळाणे (ता.बागलाण) येथे शनिवारी (ता.८) सायंकाळी घडली.
याप्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित पतीस पोलिसांनी अटक केली आहे. ललिता म्हाळू गांगुर्डे असे मृत महिलेचे नाव आहे.
कऱ्हे (ता. बागलाण) येथील ललिता म्हाळू गांगुर्डे (वय २२) ही तिच्या आईकडे आली होती. ललिता आई गीता राजेंद्र पगारे(रा. देवळाने) हिच्या सोबत शेतमजुरी करून घराकडे येत असताना पती म्हाळू गोरख गांगुर्डे (वय २३, रा.शनी मंदिर सटाणा ह.मु.कऱ्हे) याने तिला रस्त्यात अडवीत माझ्यासोबत बाहेरगावी कामास का येत नाही? अशी विचारणा करीत सोबत येण्याचा आग्रह धरला.
परंतु ललिता हिने बाहेरगावी कामाला येण्यास नकार दिल्याने या गोष्टीचा राग येऊन म्हाळू गांगुर्डे याने पत्नी ललिता हिच्यावर कोयत्याने सपासप वार करत घटनास्थळावरुन पळ काढला. जादा रक्तस्त्राव झाल्याने ललिता हिचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत कऱ्हे येथील पोलिस पाटील चंद्रसिंग सोळुंकी यांनी जायखेडा पोलीसांना घटनेची माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
घटनेचे गांभीर्य ओळखत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, संजय वाघमारे, नाना पाटील, पोलिस हवालदार राजेंद्र सोनवणे, अरविंद ढवळे, नीलेश कोळी, योगेश क्षीरसागर, उमेश भदाणे, शरद भगरे, भूषण पगारे, श्री. बहिरम, सुनील पाटील, गजानन गोटमवार, तुषार मोरे, योगिता वाघेरे, शुभांगी पवार, आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने संशयिताचा शोध घेत त्यास डाळिंबाच्या बागेतून सापळा रचत अटक केली.