नाशिक: प्रभात फेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने 15 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजीत केलेल्या प्रभातफेरी दरम्यान एका विद्यार्थिनीचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे.
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील एका शाळेतील नववीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीला प्रभात फेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने तिचा मृत्यू झाला.
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी पूजा दादासाहेब वाघ (वय १५) हिचे दि २६ जानेवारी रोजी शाळेतील प्रजासत्ताक दिनाचे ध्वजावतरण कार्यक्रम संपल्यानंतर सालाबाद प्रमाणे येथील ग्रामपालिकेच्या ध्वजावतरण जात असताना सुरू असलेल्या प्रभात फेरी दरम्यान वंदे मातरम भारत माता की जय या घोषणा देत असताना चक्कर येऊन पडली.
तिला तातडीने बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले होते. पुजा हिची प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप जायभार यांनी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले असता वाटेतच तिचे निधन झाले.
- नाशिक: उपनगरला घरकाम करणाऱ्या महिलेनेच केली दागिन्यांची चोरी
- नाशिक: कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू
याबाबत पुजा हिच्यानातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार तिला जन्मापासूनच श्वासोस्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिची तपासणी केली असता तिच्या फुफुसाला होल असल्याचे सांगितले होते. त्यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. परंतु तिचे शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. तिच्यावर शोकाकुल वातावरणात येथील स्मशानभूमीत १२ वाजेच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडे चौकशी केली असता विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना असतात त्यातून शक्य तितकी मदत तिच्या पालकांना करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत असलेले सर्व नियोजित सांस्कृतिक कार्यक्रम वरील घटनेमुळे रद्द करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.