नाशिक (प्रतिनिधी): नितीन ऊर्फ सोन्या पाराजी गायकवाड (३५, रा. वडाळा गाव) याचा सोमवार (ता. १८) सायंकाळी खून झाला होता. यातील मुख्य संशयितास भद्रकाली गुन्हे शोध पथकाने नांदेड येथून ताब्यात घेतले आहे. संशयित आणि त्याच्या पत्नीवर मृत नितीनने वार केला होता. त्याच्या रागातून खुनाची घटना घडली होती.
मृत नितीन गायकवाड आणि संशयित आकाश गोपालसिंग आडे (१९, रा. गोविंदनगर, नांदेड) यांचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यातून नितीन गायकवाड याने यापूर्वी संशयित आकाशला मारण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी (ता.१८) पुन्हा जुनी कुरापत काढून नितीन आणि संशयित आकाश यांच्यात वाद झाला.
नितीनने त्याच्याकडील कटरने संशयितास मारण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याची पत्नी जखमी झाली. संशयिताने त्याच्या हाताने वार अडवल्याने तो मोठ्या प्रमाणात जखमी झाला. संशयिताने नितीनला धक्का दिला हातातील कटर खाली पडला. त्यानंतर त्याने त्याच्याकडील कटरने नितीनच्या पोटावर वार केला, त्यात त्याचा मृत्यू झाला. संशयिताने घटनास्थळावरून पळ काढला होता.
Amazonवर ह्या वस्तू सर्वात जास्त विकल्या गेल्या.. तुम्ही घेतल्या का ?
भद्रकाली पोलिस गुन्हे पथक संशयिताच्या शोधात होते. पथकास संशयित हा मनमाड येथे गेल्याचे समजले. मनमाड येथे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यावर नांदेडला जाणाऱ्या रेल्वेमध्ये तो आढळल्याचे समजले. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, युवराज पाटील, सागर निकुंभ, उत्तम खरपाडे यांनी वरिष्ठ निरीक्षक संभाजी निंबाळकर, निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड गाठले. मोहिते यांना संशयित व त्याची पत्नी रेल्वे स्थानकावर पादचारी पुलावर झोपले असल्याचे दिसून आले. पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले.