नाशिक (प्रतिनिधी): सिडकोतील बाजीप्रभू चौकात भाजप पदाधिकारी व सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी याच्यावर गोळीबार करणाऱ्या संशयितांची गुरुवारी (ता. २७) पोलिस कोठडीची मुदत संपली.
त्यामुळे १३ संशयितांना गुरुवारी (ता. २७) पुन्हा न्यायालयात हजर केले असता, त्यांना रविवार (ता. ३०) पर्यंत तीन दिवसांसाठी पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, या गुन्ह्यात वापरण्यात आलेली पिस्तूलही पोलिसांनी हस्तगत केल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्य संशयित सागर पवार याच्यासह जया दिवे, विकी ठाकूर, किरण क्षीरसागर, गौरव गांगुर्डे, किरण शेळके, सचिन लेवे, किशोर वाकोडे, राहुल गुप्ता, अविनाश रणदिवे, श्रीजय ऊर्फ गौरव खाडे, जनार्दन बोडके, पवन पुजारी या संशयितांचा समावेश आहे. या संशयितांना नाशिकसह, परराज्यातून अटक केली होती. संशयितांना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. मुदत संपल्याने या संशयितांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, रविवार (ता. ३०) पर्यंत त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ हे करीत असून, त्यांच्या पथकाने गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल हस्तगत केली आहे. सागर पवार याने याच पिस्तुलातून कोष्टी याच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. यात दोन्ही गोळ्या लागून कोष्टी जखमी झाला. परंतु तो घटनास्थळावरून निसटण्यात यशस्वी ठरल्याने बचावला. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![]()


