नाशिक ग्रामीण पोलिसांच्या गुटखा विरोधी पथकाने त्र्यंबकेश्वर येथे गुटख्याचा कंटेनर पकडत त्यातून ८७ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईचे परिसरात स्वागत होत आहे…
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुटखा विरोधी अभियान सुरू केले आहे. या दरम्यान जिल्ह्यातील पान टपऱ्या, गोडाऊन व इतर आस्थापनांची तपासणी करण्यात येत आहे.
या कारवाई दरम्यान त्र्यंबकेश्वर रोडवरील अंबोली टी पॉइंट येथे पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुटख्याने भरलेला दिल्ली येथून मुंबई-आग्रा रोडने त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडामार्गे भिंवडी येथे जाणारा सदरहू कंटेनर पकडून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल ८७ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला
त्यानंतर उपनिरीक्षक अश्विनी टिळे यांच्या फिर्यादीवरुन त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक रामकृष्ण जगताप करत आहेत. तसेच गेल्या पंधरा दिवसांत ८८ गुन्हे दाखल करून ९० संशयितांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ३२ लाख ५४ हजार ४८३ रुपयांचा गुटखा (Gutkha) हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
दरम्यान, गुटखा, पान मसाला व इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाविषयी नागरिकांना काही माहिती असल्यास नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांक ६२६२२५६३६३ या क्रमांकावर संपर्क साधून नाशिक ग्रामीण पोलीसांनी सुरू केलेल्या अभियानास हातभार लावावा असे आवाहन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Shahaji Umap) यांनी केले आहे.