भूमाफिया रम्मी राजपूत व जिम्मी राजपूतला नाशिक क्राईम ब्रांचने या राज्यातून घेतले ताब्यात
नाशिक (प्रतिनिधी): आनंदवली खून प्रकरणात भूमाफिया टोळीचा प्रमुख फरार संशयित रम्मी राजपूतसह त्याचा भाऊ जिम्मी राजपूत यास ताब्यात घेण्यास गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाला यश आले आहे.
पथकाने आठ दिवस हिमाचल, दिल्ली, पंजाब, आणि उत्तराखंडमध्ये तंत्रविश्लेषन शाखेच्या मदतीने माग काढत दोघांच्या मुसक्या आवळल्या.
टोळीचा मास्टरमाइंड रम्मी राजपूत, सचिन त्र्यंबक मंडलिक, बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब कोल्हेसह २० जणांच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे भूमाफिया टोळीवर राज्यातील ही पहिलीच कारवाई ठरली आहे. कारवाईने भूमाफियांमध्ये पोलिसांची जरब निर्माण झाली आहे. रम्मीला घेऊन पथक आज नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी, आनंदवली येथील विशाल मंडलिक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वडील रमेश वाळू मंडलिक (७०) यांचा जमिनीच्या वादातून संशयित सचिन मंडलिक आणि त्याचे साथीदार अक्षय जयराम मंडलिक, भूषण भीमराज मोटकरी, सोमनाथ काशीनाथ मंडलिक, दत्तात्रय काशीनाथ मंडलिक, नितीन पोपट खैरे, आबासाहेब पाराजी भडांगे, भगवान बाळू चांगले, बाळासाहेब बारकू कोल्हे, गणेश भाऊसाहेब काळे, सागर शिवाजी ठाकरे, अनिल वराडे, जगदीश त्र्यंबक मंडलिक, रम्मी परमजितसिंग राजपूत, मुक्ता एकनाथ मोटकरी यांनी कट रचून होमगार्ड गणेश काळे आणि आबासाहेब भडांगे याचा भाचा भगवान चांगले यांना ३० लाख रुपये आणि १० गुंठे जमीन देण्याची सुपारी दिली.
दोघा कॉन्ट्रॅक्ट किलरने ५ फेब्रुवारी रोजी रमेश मंडलिक हे शेतात पाणी भरण्यास गेले असता धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरून खून केला. गंगापूर पोलिस ठाण्यात संशयितांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला. या टोळीवर पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी मे महिन्यात मोक्का कारवाईचा प्रस्ताव अपर पोलिस महासंचालक कायदा व सुव्यवस्था यांना प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने टोळीवर मोक्का कारवाईचा मार्ग मोकळा झाला.
पोलिसांनी केलेल्या तपासात टोळीशी संबंधित गोकुळ काशीनाथ आव्हाड, अमोल हरिभाऊ कालेकर, सिद्धेश्वर रामदास अंडे, दत्तात्र्यय अरुण सुरवाडे, नारायण गोविंद बेंडकुळे यांचेही या भूमाफिया टोळीसोबत कनेक्शन उघडकीस आले. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक आयुक्त समीर शेख यांनी केला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
अशी झाली कारवाई: रम्मी राजपूतवर गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. त्याच्याविरोधात लूकआउट नोटीस बजावण्यात आली होती. आठ महिन्यांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. अखेर गुन्हे शाखेच्या पथकाला तो हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये असल्याची माहिती मिळाली. पथकाने उत्तराखंड येथे शोधकार्य सुरू केले असता जिम्मी राजपूत हा एका हॉटेलमध्ये असल्याचे समजले. संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत रम्मी राजपूतची हा हिमाचलमध्ये असल्याचे समजले. पथकाने संशयिताला हिमाचलमध्ये ताब्यात घेतले. चौकशीत संशयित गोवा, दिल्ली, हिमाचल, चंदिगडमध्ये जागा बदलून वास्तव्य करत असल्याचे समजले.
मालमत्ता सील करण्याची कारवाई सुद्धा करणार:
रम्मी राजपूतची मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरु करण्याची प्रक्रिया सुरू आहे. टोळीचे सदस्य बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब कोल्हे यांनी मोक्का कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ती फेटाळत जामीन देण्यास नकार देत मोक्का कायम ठेवला. यामुळे या टोळीचे मनसुबे उधळले गेले.
राजकीय दबाब झुगारून कारवाई: पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी सर्व बडे राजकीय दबाब झुगारत मोक्का कारवाई केली. महसूल विभागाच्या बड्या अधिकाऱ्यांनादेखील नोटीस बजावत चौकशीसाठी बोलावले होते. संशयितांच्या विरोधात मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.