कोरोनाबाधीतांकडून अवाजवी बिले आकारली जात असल्यामुळे शासनाने उचलले हे महत्वाचे पाऊल

नाशिक (प्रतिनिधी) : खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधितांकडून अवाजवी बिले आकारली जात असल्याच्या तक्रारींची दखल घेत शासनाने विशेष समिती स्थापन केली असून या समितीमार्फत आता खाजगी रूग्णांलयावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या समितीची कामकाजाची दिशा ठरविण्यात असून कोरोना रूग्णांची वाढती संख्या विचारात घेता खाजगी रूग्णालयांमध्येही बेडसची संख्या वाढविली आहे.

यामध्ये रूग्णालयांची तपासणी करण्यात येउन कोरोना संसर्ग नसलेले किंवा जे रूग्ण घरी उपचार घेऊ शकतात, अशा रूग्णांना जर रूग्णालयात दाखल करून घेतले असेल, तर अशा रूग्णालयांवर कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिला आहे. शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आता कोरोना पॉझिटिव्ह रूग्णास त्याच्या घरी जर अलगीकरणाची व्यवस्था असेल तर घरीच उपचाराची परवानगीही देण्यात आली आहे. मात्र अनेकजण भीती पोटी रूग्णालयात दाखल होण्यास प्राधान्य देतात. शासकिय रूग्णालयांमध्ये बेडस उपलब्ध नसल्याने किंवा तेथील उपचाराबाबत संशय व्यक्त करत अनेकजण खाजगी रूग्णालयांमध्ये दाखल होतात. मात्र जे रूग्ण कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेउ शकतात अशा रूग्णांना थेट अतिदक्षता विभागात दाखल करून घेतले जाते तर कधी सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांना दाखल करून घेतले जाते. यामुळे बेड आरक्षित होउन ज्यांना खरोखर उपचाराची गरज आहे, त्यांना उपचार मिळत नाही.

हे ही वाचा:  नाशिक: सोमवारपासून होणार यांत्रिकी झाडूने रस्त्यांची स्वच्छता

तसेच खाजगी रूग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या दरांबाबतही अनेक तक्रारी येतात. याचा विचार करून शासनाने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारयांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन केली आहे. या समितीव्दारे रूग्णालयांची नियमिती तपासणी, वॉर्डांना भेटी, रूग्णांचे अ‍ॅडमिशन आणि डिस्चार्ज पॉलीसीचे योग्य पध्दतीने नियोजन करणे याकरीता ही समिती नियंत्रण ठेवणार आहे.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790