नाशिक (प्रतिनिधी) : गरिबीला कंटाळून मुंबई येथून घरातून पळून आलेली ३ चिमुकली मुले नाशिकरोड रेल्वेस्थानकात आढळून आली. रेल्वे सुरक्षा दलाने ही तिन्ही मुले ताब्यात घेऊन, सुखरूप घरी सुपूर्द केली.
वडील जेलमध्ये आहेत, तर आई धुणीभांडीचे काम करण्यासाठी दिवसभर घराबाहेर असते. या गरिबीमुळे आम्हाला पोटभर जेवायला मिळत नाही. म्हणून आम्ही घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. हे या चिमुकल्यांचे बोल काळीज हेलावून टाकणारे आहेत. बुधवारी (दि २१ ऑक्टोबर) रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास नंदीग्राम एक्स्प्रेस नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आली. दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक एस.सी.शर्मा व हवालदार राजश्री शिंदे यांना प्लॅटफॉर्मवर क्रमांक २ वर दोन मुली व एक मुलगा दिसला. कोरोनाच्या पार्श्वभूीवर सध्या स्थानकात कोणाला येण्यास परवानगी नाही. म्हणून ही मुले आढळणे संशयास्पद असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुहिलोत यांनी मुलांना विश्वासात घेऊन, कारण जाणून घेत चाइल्ड केअर ग्रुपच्या स्वाधीन केले. या मुलांची आई संगीता गणेश भूतकर (रा.मानखुर्द, मुंबई) यांनी मानखुर्द पोलिस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार दाखल केली होती.यामुळे पोलिस तपासात ही बाब उघड झाल्याने गुहिलोत यांनी मुले नाशिकरोडला ताब्यात दिली. रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे व माणुसकीवृत्तीमुळे ही ३ चिमुकली मुले आता घरी परतली आहेत.