पिंपळगावला तलावात महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक (प्रतिनिधी): पिंपळगावच्या आहेरगाव येथील पालखेड डावा कालव्यात एका महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह आढळला आहे. दरम्यान घातपात केल्याचा संशय व्यक्त होत आहे. तपासासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहे.

पिंपळगाव कारसुळच्या सोळा वर्षीय दिपीका ताकाटे असे मयत युवतीचे नाव आहे. दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी नेहमीप्रमाणे दीपिका महाविद्यालयात गेली परंतु महाविद्यालयातुन दीपिका घरी परतलीच नाही, त्यामुळे तिच्या पालकांनी तिचा शोधाशोध सुरू केली. मात्र अनेक तास उलटूनही दीपिकाचा कुठेच ठावठिकाणा न लागल्याने ,अखेर पालकांनी पिंपळगाव पोलिसांत धाव घेतली. मात्र डाव्या कालव्यात एका तरुणीचा मृतदेह आढळल्याची खबर समजताच सदर ठिकाणी जाऊन घटनास्थळी माहिती घेतली असता, तो मृतदेह दीपिकाचाच असल्याचे निष्पन्न झाले.

डाव्या कालव्यात दीपिकाचा मृतदेह सापडल्याने तिचा घातपात झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी वर्तविला असून, याबाबत पोलीस तपास करत असून शवविच्छेदनासाठी दीपिकाचे शव नाशिक जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले आहे.अधिक तपास पिंपळगाव पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे..