नाशिक: सराईत गुन्हेगार योगेश कडाळेसह टोळीतील चौघे तडीपार

नाशिकमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीचा आलेख हा वाढतोच आहे. त्यामुळे या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.

अतिशय गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या योगेश कडाळे टोळीच्या चौघांची नाशिक शहर व जिल्हा हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांच्या आदेशान्वये तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख योगेश दामू कडाळे (22, रा. भावसार भवनच्या मागे, गोंविंदनगर), उमेश किशोर गायकवाड (20), कैलास हरि भांगरे (19), अंकुश सुरेश निकाळजे (19) असे तडीपार करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

योगेश कडाळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या टोळीविरोधात परिमंडळ एकमधील विविध पोलिस ठाण्यांमध्ये सोनसाखळी ओरबाडण्यासह गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांच्याकडे हद्दपारीसंदर्भात प्रस्ताव होता. त्या प्रस्तावानुसार त्यांनी कडाळे टोळीच्या प्रमुखांसह चौघांची येत्या दोन वर्षांसाठी शहर व जिल्हा हद्दीतून तडीपार केले आहे. सोहेल उर्फ बाबु पप्पु अन्सारी (26, रा. नंदिनीनगर, भारतनगर, वडाळारोड), आफताब उर्फ रिम्मी नजीर शेख (23, रा. जहांगीरदार वाडा, बागवानपुरा, भद्रकाली. सध्या रा. गोसावीवाडा, भगूर) या दोघांचीही तडीपार केले जाणार आहे. या दोघांविरोधातही दोनपेक्षा अधिक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.