जाता जाता विश्वास नांगरे पाटलांनी मानले नाशिककरांचे आभार! बघा काय म्हणाले…

नाशिक (प्रतिनिधी) : विश्वास नांगरे पाटील यांची बुधवारी (दि.०२) मुंबई पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्था विभागाच्या सहायुक्तपदी निवड झाली. आणि नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी दीपक पांडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आज नूतन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते नाशिक शहर पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.

यावेळी नाशिककरांचे आभार मानत विश्वास नांगरे पाटील म्हणतात, “गेली दीड वर्ष मला नाशिकची सेवा करण्याची संधी मिळाली. नाशिकमध्ये काम करतांना इथली माती, इथली माणसं, इथला निसर्ग याच्या माणूस प्रेमातच पडतो. नाशिकला सांस्कृतिक, सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक ठेवा आहे. शिक्षण, शेती, उद्योग, टुरिझम या सगळ्याच क्षेत्रांमध्ये नाशिकची घोडदौड सुरु आहे. परिस्थिती कशीही असो मग तो कोविड ची असो किवा सण-उत्सव असो नाशिकची जनता नेहमी कायद्याचं पालन करून नेहमीच प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. त्याचप्रमाणे चांगल्या उपक्रमात सहभाग नोंदवत असते म्हणूनच नाशिकची प्रगती वेगाने होत आहे. अशा या प्रेमळ शहराला सोडून जात असतांना निश्चितच अंतःकरण जड आहे. तरी नाशिककरांचं प्रेम आणि आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.”