विष्णू भागवतला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

काही दिवसांपुर्वीच ४ कोटी ८ लाख ६ हजार ६०९ रूपयांच्या १२ महागड्या कार राज्यातील मोठ्या शहरांमधून पोलिसांनी जप्त केल्या होत्या. तत्पुर्वी १५ जानेवारी २०२० रोजी आर्थिक गुन्हे शाखेने भागवतच्या दोन्ही कंपन्यांच्या संपत्तीवर टाच आणून त्याची २७ बॅँक खाती गोठविली.

गुंतवणूकीवर वेगवेगळ्या योजनांद्वारे जादा मोबदल्याचे आमीष दाखवून नाशिक शहरासह राज्यातील विविध मोठ्या शहरांमध्ये कोट्यवधी रूपयांची हजारो ठेवीदारांची मागील दोन वर्षांपासून फसवणूक करणारा माऊली, उज्वलम सोसायटी तसेच संकल्पसिध्दी प्रॉडक्ट इंडियाचा संचालक संशयित आरोपी विष्णू रामचंद्र भागवत यास नाशिक पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. त्यास जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने गुरूवारपर्यंत (दि.१३) पोलीस कोठडी सुनावली.शहरातील यापुर्वी मुंबईनाका पोलीस ठाण्यात भागवतविरूध्द गुन्हा दाखल होता. तसेत शनिवारी (दि.८) त्याच्यासह साथीदारांविरूध्द पुन्हा अंबड पोलीस ठाण्यात २ लाख १० हजारांची फसवणूक केल्याचा गुन्हा एका फिर्यादीवरून दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत सुरू केला.

भागतवने स्थापन केलेल्या माऊली, संकल्पसिध्दी, उज्वलमसारख्या कंपन्यांच्या सात दलालांच्या सर्वप्रथम मुसक्या बांधल्या. त्यांनी ठेवीदारांच्या रकमेतून भागवतमार्फत कर्ज घेत महागड्या कारची खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. दलालांना गजाआड केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंबडमधील एका सोसायटीतून त्यांचा म्होरक्या संशयित भागवतलाही बेड्या ठोकल्या. त्यास न्यायालयाने गुरूवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भागवतविरूध्द हिमाचलप्रदेशच्या चंबा पोलीस ठाण्यासह पुणे ग्रामीण पोलीसांच्या हद्दीतील आळेफाटा, नाशिकच्या जायखेडा, भांडुप, जळगाव, धुळे, नंदूरबार, अहमदनगर, पिंपरी-चिंचवड या शहरांमध्येही गुन्हे दाखल आहेत.

या सर्व पोलीस ठाण्यांना भागवत फसवणूकीच्या गुन्ह्यांत हवा होता. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्याविरूध्द सुरूवातीपासूनच फास आवळला. काही दिवसांपुर्वीच ४ कोटी ८ लाख ६ हजार ६०९ रूपयांच्या १२ महागड्या कार राज्यातील मोठ्या शहरांमधून पोलिसांनी जप्त केल्या होत्या. तत्पुर्वी १५ जानेवारी २०२० रोजी आर्थिक गुन्हे शाखेने भागवतच्या दोन्ही कंपन्यांच्या संपत्तीवर टाच आणून त्याची २७ बॅँक खाती गोठविली.