नाशिक: आजपासून (दि. ६ जुलै) बेशिस्त वाहनांवर टोईंग कारवाई; इतका दंड आकारला जाणार !

आजपासून (दि. ६ जुलै) बेशिस्त वाहनांवर टोईंग कारवाई; इतका दंड आकारला जाणार !

नाशिक (प्रतिनिधी): शहरात मुख्य बाजारपेठ असो की, वर्दळीचा परिसर बेशिस्त वाहनधारक रस्त्यावर वाहने उभी करतात. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेकडून पुन्हा एकदा टोईंगचा ठेका देण्यात आलेला आहे. ६ जुलै ते ५ ऑक्टोबर अशा तीन महिन्यांसाठी ही कारवाई केली जाणार आहे.

सकाळी ९ ते रात्री ९ वाजेदरम्यान शहरातील विविध भागात ही कारवाई केली जाणार आहे. खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून टोईंगही कारवाई कशी केली जाणार यासाठी याबाबतचे प्रात्यक्षिक मंगळवारी दाखविले जाणार आहे.

रस्त्यावर कुठेही वाहने लावणाऱ्यांवर मंगळवार (दि. ६) पासून टोईंग कारवाई सुरू करण्यात येणार आहे. नो पार्किंगमध्ये वाहने लावण्यामुळे वाहने टोईंग केल्यास दुचाकीसाठी शासकीय दंड २०० रुपये व टोईंगचा दर ९० रुपये असे २९० तर चारचाकी वाहनांसाठी शासकीय दंड २०० रुपये तर टोईंगचा दर ३५० असा ५५० रुपये दंड भरावा लागणार आहे. विशेष म्हणजे तीनचाकी वाहनांसाठी शासकीय दंड २०० रुपये असला तरी टोईंगचा दर फक्त १ रुपये असे २०१ रुपयेच असणार आहे. वाहतूक शाखेच्या वतीने तीन महिन्यांसाठी हा ठेका देण्यास आला असून पहिल्या टप्प्यात पाच परिसरात ही कारवाई होणार आहे.

या प्रात्यक्षिकानंतर लगेगच टोईंगची कारवाई केली जाणार असून त्याबाबत पोलिस आयुक्तांकडून कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. दरम्यान शहरात पुरेशी पार्किंगची सुविधा कराव्या तसेच रस्त्यावर नो पार्किंगचे फलक लावावे त्यानंतरच टोईंगची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

यापूर्वीचा ठेका करण्यात आला होता रद्द:
वाहनधारकांशी अरेरावी करणे, ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांकडून केले जाणारे वर्तन तसेच टोईंगबाबत वाढत्या तक्रारी लक्षात घेता यापूर्वीचा टोईंगचा ठेका रद्द करण्यात आला होता.