चोरीच्या दुचाकी विक्री करणारे संशयित जेरबंद

नाशिक (प्रतिनिधी): दुचाकी चोरी करून ग्रामीण भागात विक्री करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यास मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. गोंदे दुमाला येथे पथकाने दुचाकी विक्री करताना अटक केली. अभिषेक मनोज प्रसाद (रा. शिवाजीनगर), सुमित महादू बागुल (रा. कामगारनगर), मोहन सुनील महाले (रा. कार्बननाका), रोहन विजय शिंदे (रा. सातपूर) नीलेश पंढरीनाथ बर्हे (रा. गोंदे दुमाला) अशी या दुचाकी चोरांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गंगापूर परिसरातील ध्रुवनगर येथून दुचाकी चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मध्यवर्ती गुन्हे शाखेचे युनिट समांतर तपास करत असताना विशाल वाघ, युवराज कानमहाले यांना माहिती मिळाली. संशयित शहरातून चोरी केलेल्या दुचाकी ग्रामीण भागात विक्री करत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, महेश शिंदे, बाळू बागुल, अनिल शिंदे, सचिन अजबे, सूरज गवळी, संतोष वाघ यांच्या पथकाने उपअायुक्त संजय बारकुंड, सहायक आयुक्त मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.