सावधान: नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाबत अफवेचा पहिला गुन्हा दाखल- दोन जण ताब्यात

येवला: कोरोनाव्हायरसने आता महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे आणि दिवसागणिक नवीन संशयित रुग्णांची माहिती समोर येत आहे. अशातच सोशल मिडियावर अफवांचे पिक आले आहे. व्हाट्सअप ग्रुपवर पाटोदा व ठाणगाव येथे कोरोनाचे रुग्ण आढळल्याची अफवा पसरविणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे कोरोना संदर्भात अफवा पसरविणारा जिल्ह्यातील पहिला गुन्हा घडला आहे. ऋत्विक लक्ष्मण काळे, कलीम सलीम पठाण अशी अफवा पसरवणाऱ्या तरुणांची नवे आहेत. दरम्यान राज्यात कोरोना व्हायरसचा फैलाव रोखावा यासाठी राज्यशासन सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे.

या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अफवा पसरू नये यासाठी काळजी घेतली जात असतांना येवला तालुक्यात हा गुन्हा घडलं आहे. तालुक्यातील नागडे व निमगाव मढ येथील तरुणांनी ठाणगाव येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याची अफवा व्हाट्सअँप ग्रुपवर पसरवली. अफवा पसरविल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले. त्यानंतर परिसरात अनेकांनी याबाबत इतरही ठिकाणी अशी माहिती कळविल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली. हि माहिती पोलिसांना कळताच या दोघांना ताब्यात घेतले.

जिल्हा प्रशासन कोरोना व्हायरस चा संसर्ग रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. आणि त्यासाठी यंत्रणाही सज्ज आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवा पसरवू नये आणि संयम राखावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.