प्रतिसाद नसलेल्या शाळांतील पोषण आहार बंद करणार

शालेय पोषण आहार योजनेची जबाबदारी मुख्याध्यापकांवर निश्चित केल्याने आचार्यांवर आता आचारी होण्याची वेळ आली आहे. ग्रामीण, आदिवासी आणि कुपोषण ग्रस्त भाग आणि शहरातील झोपडपट्टी परिसर वगळता इतर ठिकाणी शालेय पोषण आहारास प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आवश्यकता नसलेल्या ठिकाणी पोषण आहार बंद करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिली.

जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे आयोजित मुख्याध्यापक उद्बोधन शिबिरात ते बोलत होते. मविप्र संस्थेच्या रावसाहेब थोरात सहभागृहात बुधवारी (दि.५) पार हे शिबिर पार पडले. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, नाशिकचे पदवीधर आमदार सुधीर तांबे, शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांच्यासह मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.