त्र्यंबकेश्वरला दर्शनरांगेतील भाविकाचा मृत्यू

त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनरांगेत उभ्या असलेल्या भाविकास अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यास चक्कर येऊन तो खाली कोसळला. त्यास त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले असता त्याच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथे नेण्याचे ठरले. तथापि १०८ रुग्णवाहिका वेळेवर आली नसल्याने अत्यवस्थ रुग्ण नाशिक येथे वेळेत पोहोचू शकला नाही. त्यामुळे रुग्णवाहिकेतच त्याचा मृत्यू झाला.

श्रीदेवी सिंग यादव असे या भाविकाचे नाव असून, तो दिल्लीतील नोएडा येथील रहिवासी आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनरांगेत उभा असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो खाली कोसळला. त्याला देवस्थान कर्मचाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर डॉ. राजेंद्र दुसाने यांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथे नेण्यास सांगितले. उशिरा आलेल्या रुग्णवाहिकेतून त्याला नाशिकला आणले. तथापि जिल्हा रु ग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.