“तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल…”

नाशिक (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या राज्य परिवहन विभागाने एसटीच्या माध्यमातून अवजड वाहतूक करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. नाशिक ट्रान्सपोर्ट आणि गुड्स असोसिएशन चे अध्यक्ष पी.एम. सैनी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांना निवेदन दिले आहे.  

याआधी एसटी महामंडळाने पार्सल वाहतूक सुरु केली होती त्यासाठी ट्रान्सपोर्ट असोशिएशन ची कुठलीही हरकत नव्हती परंतु संपूर्ण ट्रक मालवाहतूक करण्याचा निर्णय आता परिवहन मंडळाकडून घेण्यात आला. आणि मालवाहतूक सुरु देखील करण्यात आली. याचा परिणाम ट्रान्सपोर्ट उद्योगावर होईल. आणि व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येईल. असे निवेदनात म्हटले आहे.

त्यामुळे शासनाने पुनर्विचार करून एसटी महामंडळाच्या माध्यमातून अवजड वाहतूक करण्याचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.