वाहनांच्या काचा फोडून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला अंबड पोलिसांनी केली पाच तासात अटक

अंबड तसेच चुंचाळे परिसरात ४ मार्चच्या मध्यरात्री ते ५ मार्चच्या पहाटेच्या दरम्यान काही अज्ञातानी वाहनाच्या काचा फोडून धुमाकूळ घातला होता. लोखंडी रॉडने लोकांच्या घरासमोर उभ्या असलेल्या फोर व्हीलर आणि थ्री व्हीलरच्या काचा या टोळीने फोडल्या होत्या. यावेळी हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैदही झाला होता. मात्र संशयित फरार झाले होते.

कसा लागला तपास

अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरु झाला. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अंबड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील अक्षय उत्तम जाधव व शैलेश गोरखनाथ माळी व त्यांचे सोबत इतर दोन लोकांनी हा प्रकार केल्याचे समजले. त्यानुसार गुन्हे शोध पथकामधील पोलीस अंमलदार यांनी फाशीचा डोंगर, सातपुर, श्रमिक नगर याठिकाणी जावून त्यांचा शोध घेतला मात्र ते सापडले नाही. पुन्हा माहिती मिळाली की चुंचाळे, जाणता राजा चौक इ. ठिकाणी गाडयांचे काचा फोडणाऱ्या टोळीतील हे लोक एक्सलो पांईट याठिकाणी येणार आहेत. त्यानुसार सापळा रचण्यात आला. काही वेळानंतर २ दुचाकिंवर एकूण ४ जण त्याठिकाणी आले. त्यापैकी तिघांना जागीच पकडण्यात आलं तर चौथा बाईकवरून फरार झाला.

पकडलेल्या तीन लोकांमध्ये १) अक्षय उत्तम जाधव, वय२४, रा. वरचे चुंचाळे, अंबड, नाशिक, २) शैलेश गोरखनाथ माळी, वय २६, रा. योगेश्वर विहार रो हाउस नंबर ४,मेजवाणी हॉटेल जवळ, वावरे नगर, सिडको, नाशिक ३) इंद्रजीत अशोक खुराणा, वय २१, रा. मटाले हाउसचे मागे,त्रिमुर्ती चौक, सिडको, नाशिक यांचा समावेश आहे. अंबड पोलिसांच्या या तत्पर कारवाईचं नागरिकांनी कौतुक केलं आहे.