एक्साईजने जप्त केलेला साडेतीन लाखाचा मद्यसाठाच चोरट्यांनी पळवला !

नाशिक: लॉकडाऊन सुरु झाल्यापासून तळीरामांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यामुळे आता त्यातल्या काहींनी एक्साईजने जप्त केलेला साडेतीन लाखाचा मद्यसाठाच पळवला आहे. पेठ रोड वर मार्केट यार्द समोर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आणि मागच्या बाजूस गोदाम आहे. चोरी गेलेला मद्यसाठा हा विभागीय उत्पादन शुल्क विभागाचा आहे. खरं म्हणजे 6 एप्रिल ते 11 एप्रिल २०२० च्या दरम्यान ही चोरी झाली आहे, मात्र ती 11 तारखेच्या सुमारास विभागाच्या लक्षात आली.

पहिल्या मजल्यावर असलेल्या या गोदामात चोरटे तुटलेल्या खिडक्यांवरून चढले आणि माल लंपास केला. विशेष म्हणजे या ठिकाणी कुठलेही सीसीटीव्ही लावलेले नाहीत. यावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाचा गलथान कारभारही समोर आला आहे. पोलिसांनी यातील आरोपींना अटक केली आहे. १९ वर्षाचा मंगल शिंदे आणि ४० वर्षाचा रामदास पाडेकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघेही फुलेनगर भागातील राहणारे आहेत.