मंदिराची दानपेटी फोडणाऱ्याला इंदिरानगर पोलिसांनी केली अटक

इंदिरानगरच्या महारुद्र परिसरातील हनुमान मंदिराची दानपेटी फोडून पैसे चोरणार्याला इंदिरानगर पोलिसांच्या गस्तीपथकाने शिताफीने अटक केली आहे. इंदिरानगरचे फिरोज शेख यांनी आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास इंदिरानगर पोलीस ठाण्याला कळविले की, हनुमान मंदिरात तीन व्यक्ती संशयित रीतीने फिरत आहेत. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. गस्ती पथकाला पाहताच तीनही भामटे पळ काढू लागले. त्यापैकी एकाचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्याचे नाव रवी साहेबराव खडे (राहणार म्हाडा वसाहत, वडाळागाव) असे आहे. याने हनुमान मंदिराच्या ग्रीलचे कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला आणि दानपेटीतील काही रक्कम लंपास केली. मनोज शेंडगे व अक्षय खिल्लारे हे त्याचे दोन साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.