दहावी-बारावी: मोठी बातमी! ‘या’ अडचणी असल्यास जूनमध्ये देता येणार परीक्षा

मुंबई (प्रतिनिधी): शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी बारावीच्या परीक्षा (SSC HSC Exam 2021) ऑफलाईन (लेखी परीक्षा) पद्धतीनुसारच होणार असल्याची माहिती दिली होती. यानंतर विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न उभे ठाकले होते. मात्र, आता या प्रश्नांची उत्तरंही समोर आली आहेत.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. कोरोनामुळे १० वी आणि बारावीचे जे विद्यार्थी ठरलेल्या तारखेला परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे.

काय आहेत अटी –
संबंधित विद्यार्थी कोरोनाबाधित असेल, विद्यार्थ्यांच्या घरात, परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहात असलेला भाग सील केला असेल, तर अशा विद्यार्थ्यांना आता दहावी आणि बारावीची परीक्षा देता येणार नाही. त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे.

आताच्या परीक्षेला विद्यार्थी आला नाही तर संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे. यामुळे या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही आणि विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येईल.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये या परीक्षा ऑनलाईन व्हाव्या अशी अनेक पालक आणि विद्यार्थ्यांची मागणी आहे. मात्र, परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतंच जाहीर केलं आहे. यामुळे, अनेकजण चिंतेत असताना आता यावरही मार्ग काढण्यात आला असून कोरोनामुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांची जूनमध्ये पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे.