दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा झाल्या जाहीर !

नाशिक (प्रतिनिधी) : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली असून, मुलांनी आता पतीक्षेची तयारी करायला काही करायला हरकत नाही. कारण दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान असेल. तर, दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे या कालावधी दरम्यान घेतली जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावी व बारावीच्या २०२० च्या परीक्ष्यांचा निकाल दरवर्षीपेक्षा जुलै महिन्यात उशिरा लागला. त्यानंतर दहावी बारावीची पुरवणी परीक्षा नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात घेण्यात आली. मात्र, त्यानंतर राज्यामधील ३० लाखांहून अधिक विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे लक्ष दहावी व बारावीच्या २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षांकडे लागले होते. त्यामुळे पालक व विद्यार्थी हे संभ्रमात होते.

त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी (दि.२१ जानेवारी) रोजी ट्विटरच्या माध्यमातून दहावी व बारावीच्या परीक्ष्यांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्याद्वारे, बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे मध्ये होईल. तसेच बारावीचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल.

तर, दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिलला, तर प्रात्यक्षिक परीक्षा २८ मे पासून घेण्यात येईल व ३१ मे पर्यंत संपेल. दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकार तसेच आरोग्य विभागाने वारंवार दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करूनच या परीक्षांचे आयोजन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.