मालेगाव तालुक्यातील जवान गलवान खोऱ्यात कर्तव्य बजावत असतांना शहीद

नाशिक (प्रतिनिधी) : मालेगाव तालुक्यातील निम्गोले साकोरी परिसरातील एक जवान चीनच्या सीमेवर बचाव कार्य करत असतांना शहीद झाले आहेत. सचिन विक्रम मोरे असे या जवानाचे नाव आहे. बुधवारी (दि.२४) रात्री चीनच्या सीमेवर आपले कर्तव्य पार पाडत असतांना सचिन शहीद झाले आहेत.

नदीला पाणी सोडल्याने तीन भारतीय जवान वाहून चालले होते. त्यांना वाचवण्यासाठी सचिन यांनी नदीत उडी घेतली. परंतु रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने सचिन नदीतील दगडावर कोसळले. आणि ते शहीद झाले.

सचिन मोरे हे गेल्या १७ वर्षांपासून भारतीय सेनेत कार्यरत होते. आणि मागील एक वर्षापासून भारत-चीन सीमेवर तैनात होते. सध्या भारत-चीन सीमेवर असलेल्या गलवान खोऱ्यात तणावाचे वातावरण आहे. या ठिकाणी दोन्ही देशांकडून रस्त्याचे काम सुरु आहेत. तसेच एक पूल बांधण्याचे काम सुरु आहे. यावेळी चीनने नदीत पाणी सोडल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.