ऑनलाईन फसवणूकीतील साडेचार लाख रुपये ग्रामीण पोलिसांनी वाचवले

नाशिक (विशेष प्रतिनिधी): एकीकडे कोविड-१९ संक्रमणाविरुद्ध लढाई सुरु असताना ग्रामीण पोलिसांनी सजग रहात दुसरीकडे ऑनलाईन फसवणूकीतील साडेचार लाख रुपये वाचवण्यात यश मिळवले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत सायबर पोलिसांच्या या कामगिरीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. 

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन व्यवहार वाढीस लागल्याची संधी साधून चोरटे सक्रीय झाले होते. कर्ज मिळवून देतो, ऑनलाईन जॉब तसेच लॉटरी लागल्याचे आमीष दाखवून फसवणुकीच्या ५७ घटना घडल्या होत्या. त्यात २१ लाख ४० हजार रुपयांना गंडा घालण्यात आला होता. त्यापैकी चार लाख ४७ हजार रुपयांचे व्यवहार तत्काळ थांबवून ती रक्कम परत मिळवण्यात यश आले आहे.