Breaking: मालेगावमध्ये पोलीस उपनिरीक्षकाची पोलीस स्टेशनमध्येच आत्महत्या

मालेगाव शहरात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. शहरात कोरोनाबाधितांची संख्या 12 वर पोहोचली आहे. शहरातील नागरिक कोरोनाच्या  दहशतीखाली असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका उच्च पोलिस अधिकाऱ्याने पोलिस स्टेशनमध्येच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिस नियंत्रण कक्षात ही घटना घडली. अजहर शेख यांच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट असले तरी कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्त्या केल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे घटना घडली त्यावेळी नियंत्रण कक्षातील सुसंवाद हॉलमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक आरती सिंह यांच्या उपस्थित कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नगरसेवकांची बैठक सुरू होती. त्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख हे मूळ जळगाव जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांचे तीन भाऊ देखील पोलिस दलात कार्यरत आहे. मात्र, अजहर शेख त्यांच्या पत्नीने त्यांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे ते मागील काही दिवसांपासून तणावात होते. या कौटुंबीक वादातून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असावं, अशी चर्चा सुरु आहे.