३० टक्के उद्योगांना आजपासून पुन्हा ऑक्सिजन पुरवठा

नाशिक (प्रतिनिधी): राज्य शासनाने कोराेना संकट काळामध्ये वैद्यकीय ऑक्सिजनची गरज आणि तुटवडा लक्षात घेत उद्योगांचा १०० टक्के ऑक्सिजन पुरवठा दोन महिन्यांपूर्वी बंद केला होता. हा ऑक्सिजन पुरवठा आता परिस्थिती काहीअंशी नियंत्रणात असल्यामुळे २० टक्के सुरू करण्यात यावा असा निर्णय पाच दिवसांपूर्वी घेतला गेला होता. मात्र जिल्ह्यात तो आज सोमवारपासून लागू होत आहे, ज्यामुळे बंद अवस्थेत असलेले तीस टक्के उद्योग पुन्हा एकदा पूर्ववत सुरू होऊ शकणार आहे.

स्टील, फॅब्रिकेटिंग, कास्टिंग, लेझर कटिंग यांसह जेथे-जेथे वेल्डिंग, जोड देण्याचे काम होते असे लहान, मोठे जवळपास तीस टक्के जिल्ह्यातील उद्योग ऑक्सिजन पुरवठा नसल्याने प्रचंड अडचणीत होते. काही मोठे उद्योग वगळता स्टील उद्योगांसह अनेक छोटे उद्योग थेट यामुळे बंद होते, ज्यांच्यावर हजारो कामगार अवलंबून आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर व प्रत्यक्षात ऑक्सिजनची मागणीदेखील मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने व प्रशासनाकडे बफर स्टॉक निर्माण झाल्याने उद्योगांना किमान ५० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी उद्योजकांच्या संघटनेने नुकतीच जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.

उद्योग विकास फ्रंटचे अध्यक्ष शशिकांत जाधव आणि तुषार चव्हाण यांनी ही मागणी केली. त्यापूर्वी आयमा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष धनंजय बेळे , उपाध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललीत बुब आणि पदाधिकाऱ्यांनी किमान काही प्रमाणात का होईना उद्योगांसाठी ऑक्सिजन द्यावा, अशी मागणी केली होती.

शासनाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वसामान्य उद्योजकांकडून स्वागत होत असले तरी किमान ५० टक्के ऑक्सिजन मिळाल्याशिवाय उद्योगांचे कामकाज सुरळीत होऊ शकत नाही असे या उद्योजकांचे म्हणणे आहे. हीच मागणी उद्योग विकास फ्रंटने देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तूर्तास काहीही असले तरी आजपासून उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा सुरू होणार असल्याने हे उद्योग पूर्व सुरू होऊ शकणार आहे, हाच काय तो दिलासा म्हणावा लागेल.