शहरात नायलॉन मांजाचा सर्रास वापर; इंदिरानगर येथे तरुणाचा मांजाने कापला गेला गळा !

नाशिक (प्रतिनिधी) : शहरात गेल्या काही दिवसांपूर्वीच नायलॉन मांजामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतर पोलिसांकडून नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम जोरदाररीत्या हाती घेण्यात आली होती. परंतु अशीच घटना इंदिरानगर परिसरात घडली असून, एका तरुणाचा नायलॉन मांजामुळे गळा कापला गेला आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

आज दिनांक ७ जानेवारी रोजी इंदिरानगर परिसरातून मयूर कुलकर्णी हा युवक दुचाकीवर जात होता. दरम्यान, त्याच्या मानेला नायलॉन मांजाचा विळखा बसला व  तो गंभीर जखमी झाला आहे. मयूरवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर, त्याच्या गळ्याला ७ टाके घालण्यात आले आहेत.

तर, शहरात अशाच प्रकारची दुसरी घटना देखील मंगळवारी (दि.५ जानेवारी) रोजी घडली होती. त्यानुसार, दुपारी ४ वाजेच्या सुमारास पूजा गणेश सदाशिव (वय २५, रा.म्हसरूळ) ही ऍक्टिव्हा दुचाकीने मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्याने म्हसरूळकडे जात होती. दरम्यान, ती सिग्नलवर थांबली असता, अचानक हवेतून नायलॉन मांजा आला व तिच्या गळ्याला घासला गेला.

परंतु, पूजाचे वेळीच लक्ष गेल्याने तिने हात आडवा केला तसेच तिने स्टोल बांधलेला असल्याने गळ्यावर गंभीर जखमा झाल्या नाहीत. यानंतर तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. परंतु या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे  नागरिकांकडून पोलिसांनी नायलॉन मांजाविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.